आयबीएमने बनवला नॅनो चित्रपट

चित्रपट आपण सध्या मोठय़ा पडद्यावर पाहणे पसंत करतो, परंतु आता चित्रपट अगदी सूक्ष्म म्हणजे रेणवीय पातळीवर पाहू शकणार आहोत. आयबीएमने असा दावा केला आहे, की त्यांनी अत्यंत सूक्ष्म पातळीवर चित्रपट  तयार केला आहे. हा चित्रपट म्हणजे एक मिनिटाची व्हिडिओ आहे. यात कार्बन मोनॉक्साईडचे रेणू फेररचना करून मुलगा नाचतो आहे, चेंडू फेकतो आहे, असे दृश्य यात दिसते आहे. यात प्रत्येक फ्रेम ही ४५ बाय २५ नॅनोमीटर इतक्या सूक्ष्म आकारातील आहे. 
एका इंचात २५ दशलक्ष नॅनोमीटर बसतात. या छोटय़ाशा व्हिडिओत संगीताची जोडही आहे. या नॅनो चित्रपटाचे नाव आहे, ‘अ बॉय अँड हिज अ‍ॅटम’. या व्हिडीओत अणूंच्या हालचालींचा वापर केला आहे. हे तंत्र पूर्वीही वापरण्यात आले असले तरी एखादी गोष्ट व्हिडीओच्या माध्यमातून मांडण्यासाठी त्याचा वापर पहिल्यांदाच करण्यात आला आहे, असा दावा, आयबीएमचे मुख्य वैज्ञानिक अ‍ॅंड्रस हेनरिच यांनी केला आहे. आण्विक पातळीवरचा हा नॅनो चित्रपट एक गमतीदार अनुभव आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या जेमी पॅनस यांनी सांगितले की, जगातील सर्वात लहान स्टॉप मोशन फिल्म म्हणून आम्ही या व्हिडीओला मान्यता दिली आहे.
या वर्षांच्या सुरुवातीला हा छोटा चित्रपट/ व्हिडिओची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी आयबीएमने स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोपचा वापर केला आहे. कॅलिफोर्नियातील सॅन जोस येथे हा मायक्रोस्कोप आहे. या सूक्ष्मदर्शकाने एखादा पृष्ठभाग १० कोटी पट मोठा करून दाखवला जातो. हा सूक्ष्मदर्शक -२६६ अंश सेल्सियस इतक्या कमी तापमानाला काम करतो. त्यामुळे अणूंना स्थानबद्ध करता येते किंवा काक्ष तपमानाला ते फिरू शकतात. 
तांब्याच्या पृष्ठभागासमवेत वापरलेली अतिशय सूक्ष्म सुई नियंत्रित करण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर करण्यात आला. १ नॅनोमीटर इतक्या अंतरावर ही सुई कार्बन मोनॉक्साईडच्या रेणूंना खेचू लागली व पृष्ठ भागाच्या विशिष्ट ठिकाणी त्यांना आणू लागली. या चित्रपटात अंकांसाठी जे बिंदू वापरले आहेत, ते प्रत्यक्षात ऑक्सिजनचे अणू आहेत.
वैज्ञानिकांनी या चित्रपटात २४२ स्थिर प्रतिमा वापरून २४२ फ्रेम्स तयार केल्या आहेत.’माहितीचे डोंगर उभे राहत आहेत, त्याचा वापर वाढत आहे तसे माहिती साठवण्याचे मार्ग बदलत आहेत. हा मार्ग, अर्थात आण्विक पातळीवर माहिती साठवण्याचा आहे. ‘नॅनो’ चित्रपट हा त्याचाच आविष्कार आहे.
हा चित्रपट खालील वेबसाइटवर आहे.  (http://bit.ly/17ZmHIt )
Exit mobile version