ब्लॉग म्हणजे नक्की काय हे समजून घेणे , आवश्यक आहे. प्रसारमाध्यमे बातम्या वा विचार लोकांपर्यंत पोचवतात. बातमीदार वा प्रस्थापित लेखक वृत्त किंवा लेख निर्माण करतो आणि मग संपादकीय टीम त्यांच्या निकषांवर उतरणाऱ्या गोष्टींना प्रसिद्धी देते. अशा प्रसिद्धीची मक्तेदारी मोजक्यांच्याच हातात केंद्रीत होते. पण तुमच्या-आमच्या सारख्यांचे काय ? आपल्यालाही मते , विचार असतात. आपल्या आयुष्यातही अविस्मरणीय घटना घडतात आणि हे सर्व लोकांपर्यंत पोचावे , अशी आपलीही इच्छा असते. हे कसे होणार ? अशावेळी ब्लॉग्स मदतीस येतात.
माझ्या मुलीने तिचा अठरावा वाढदिवस रक्तदान करून साजरा केला. माझ्या मते , ही अनुकरणीय गोष्ट आहे. मी ही घटना माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध केली. ती बऱ्याच लोकांपर्यंत पोचली आणि त्याचे पर्यवसन आमच्या ऑफिसच्या वर्धापनदिनी रक्तदान शिबीर भरवण्यात झाले. काहींनी प्रत्येक वाढदिवसाला रक्तदान करायचे ठरविले. माझ्या ब्लॉगच्या गैरहजेरीत हे काहीच घडले नसते!
ब्लॉग हा शब्द ‘ वेब लॉग ‘ मधल्या ‘ वे ‘ ला वगळून बनला आहे. त्याचा शब्दशः अर्थ ‘ वेबवरची नोंदवही ‘. ब्लॉग हे एक नवे माध्यम , निओ-मीडिया आहे. ब्लॉग्समुळे आपल्यापैकी प्रत्येकाला बातमीदार , लेखक , प्रकाशक होणे शक्य झाले आहे. ब्लॉग ही एक विशिष्ट प्रकारची विनामूल्य वेबसाइट असते. एखादा व्यवसायिक त्याच्या व्यवसायाविषयी ब्लॉग बनवू शकतो , एखादे आजोबा त्यांच्या नातवंडांसाठी ब्लॉगद्वारे गोष्टी सांगू शकतात. अमिताभ त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहू शकतो , तर एखादी पहिलटकरीण मातृत्वाचे नवनवीन अनुभव शेअर करू शकते. विचार करणारा , ते शेअर करण्याची इच्छा असलेला कोणीही आपला ब्लॉग चालू करू शकतो.
ब्लॉग लिहिणाऱ्याला ब्लॉगर म्हणतात , तर ब्लॉग लिहिण्याला ब्लॉगिंग. ब्लॉगवरच्या प्रत्येक नोंदीला ‘ब्लॉगपोस्ट ‘ किंवा नुसतेच ‘ पोस्ट ‘ म्हणतात. वर्ड किंवा तत्सम कुठलाही प्रोग्रॅम वापरता येणारा कोणीही ब्लॉगपोस्ट्स लिहू शकतो.
बहुतेक ब्लॉग्स हे ऑनलाइन डायरी स्वरुपात असतात. इथे विरोधाभास हा की , डायरी अत्यंत खाजगी असते , तर ब्लॉग्स जगजाहीर. कोणालाही सांगता येणार नाही , अशा स्वत:च्या वा इतरांच्या खासगी गोष्टींची ब्लॉगर्स अनावधानाने ब्लॉग्सवर नोंद करतात. यातूनच अनेकवेळा गुप्तताभंगाच्या समस्या निर्माण होतात.
वर्तमानपत्रात वा टीव्हीवर प्रसिद्ध होणारी गोष्ट अल्पजीवी असते. पण ब्लॉग मात्र इंटरनेटवर असल्याने चिरंजीव असतो. पारंपारिक माध्यमे ‘ एक दिशा मार्गा ‘ प्रमाणे फक्त विचार प्रसारित करू शकतात , पण तिथे चर्चेला सहज अवसर नसतो. वाचकांची पत्रे वा प्रेक्षकांचे फोन या संभाषणाच्या मर्यादीत संधी. पण ब्लॉगवरची प्रत्येक नोंद एक संवाद होऊ शकतो. वाचक प्रश्न विचारतात , विचार मांडतात आणि लेखक त्यांना प्रतिसाद देतो.
सेठ गोडीन हे सुप्रसिद्ध मार्केटिंग गुरू , त्याच्या ‘ ट्राइब्ज- वी नीड यू टु लीड अस ‘ या पुस्तकात नायकांना समविचारींच्या जनजाती , ट्राइब्ज बनवून जग बदलण्याचे आवाहन करतो. स्वतःची कुळी बनवण्याकरता ब्लॉग हे एक उत्तम साधन आहे , कारण ब्लॉग प्रत्येकाला आवडीच्या विषयावर लिहिण्याची मुभा देतात आणि त्यांचा युनिक श्रोतृवर्ग बनवण्यास मदत करतात.
आत्तापर्यंत सांगितलेल्या काही गोष्टी फेसबुकलासुद्धा लागू होतात. मग फेसबुक आणि ब्लॉग्समध्ये फरक तो काय ?सामान्यतः ब्लॉगपोस्टस मोठे असतात तर फेसबुकवरचे पोस्ट लहान , मायक्रो असतात. ब्लॉग्स , फेसबुक , युट्यूब, ट्विटरमधले एक समान तत्त्व म्हणजे या सर्व सुविधा प्रसारमाध्यमांची मक्तेदारी मोडून काढतात आणि कोणालाही त्यांचे म्हणणे प्रसिद्ध करण्याचे स्वातंत्र्य देतात. या प्रकारे निर्माण झालेल्या साहित्याला ‘ सर्वनिर्मित साहित्य ‘ ( यूजर जनरेटेड कंटेंट) म्हणून संबोधिले जाते.
जस्टीन हॉल हा आद्य ब्लॉगर म्हणून ओळखला जातो. त्याने १९९४ साली links.net ही वेबडायरी चालू केली. १९९७मध्ये जॉर्न बार्गरने ‘ वेब लॉग ‘ या नावास जन्म दिला आणि एप्रिल १९९९मध्ये पीटर मरहोल्ट्झने ‘ वे ‘वगळून त्याला ब्लॉग म्हणण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला ब्लॉग बनवण्याची साधने फक्त कॉम्प्युटर तज्ज्ञांनी वापरण्याजोगी असल्याने ब्लॉग्सची संख्याही मर्यादित होती. पण हळूहळू सर्वसामान्यांना सहज वापरता येऊ लागली. १९९९साली ‘ ब्लॉगर ‘ ही लोकप्रिय आणि मोफत ब्लॉग निर्माण करण्याची सेवा चालू झाली. त्याच्याच आगेमागे ओपन डायरी , लाइव्ह जर्नल या सेवा उपलब्ध झाल्या आणि ब्लॉग्स वाढू लागले. जुलै २०११ मध्ये १६ कोटींहून जास्त ब्लॉग्स अस्तित्वात असल्याची माहिती आहे.
ब्लॉग्सचा उदय जरी पारंपरिक प्रसारमाध्यमांना पर्याय म्हणून झाला असला , तरी आता या दोघांमधला फरक काही बाबतीत अस्पष्ट होऊ लागला आहे. ब्लॉग्समधले लिखाण हे बहुतेकदा अव्यवसायिकांनी केलेले असते. त्यामुळे तज्ज्ञ त्याच्या अचूकतेबद्दल साशंक असतात. तरीही बरेचदा वाचक प्रस्थापित माध्यमांपेक्षा ब्लॉग्सवर अधिक विश्वास टाकतात.
ब्लॉग्सवर संपादकीय संस्कार होत नसल्यामुळे हे लिखाण सर्वसामान्य वाचकांकरता कितपत योग्य , याबद्दलही तज्ज्ञांची खात्री नसते. मात्र या संपादकीय ‘ फिल्टर ‘ ची अनुपस्थितीच एखाद्या पत्रकाराला ब्लॉग्सकडे आकर्षित करते. हे लक्षात घेऊन बऱ्याच वृत्तसंस्थांनी आता आपले ब्लॉग्स चालू केले आहेत. ब्लॉगर पत्रकार झाल्याचीही उदाहरणे आहेत. अनेक ब्लॉग्स पुस्तकात रुपांतरीत झाले आहेत , तर ‘ ज्युली अँड ज्युलिया ‘ हा संपूर्ण हॉलीवूडपटच ज्युली पॉवेलच्या ब्लॉगवर आधारित आहे.
ब्लॉग हे एक मल्टीमीडिया माध्यम आहे. त्यामुळे एकाच ब्लॉगपोस्टमध्ये लिखित मजकूर , ऑडिओ , व्हिडिओ वापरता येतात. ही सर्व माध्यमे एकाच वेळेस वापरून एखाद्या सहलीचा अल्बम वा चित्रपटाचे परीक्षण आकर्षकरित्या प्रसिद्ध करता येते. आता तर ब्लॉग्स हे केवळ लिखाणापुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत. मोबाइल आणि वेब कॅमेऱ्याच्या प्रसारामुळे आता व्हिडिओ ब्लॉग्सही वेगाने पसरू लागले आहेत.
ब्लॉग हा त्याच्या कर्त्याच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. ब्लॉग लिहिण्यामागची प्रत्येकाची प्रेरणा वेगळी असते. २०११ सालच्या एका सर्व्हेनुसार ६० टक्के ब्लॉगर हौशी खेळाडू आहेत , तर ५ टक्के त्यांची उपजीविका ब्लॉग्स लिहून करतात. ब्लॉगमागचा सगळ्यात प्रबळ हेतू ‘ आपले ज्ञान व अनुभव जागाबरोबर शेअर करणे ‘. त्याशिवाय, आपल्या आवडीच्या विषयावर आपली मते व्यक्त करणे , आपल्या कळकळीच्या कार्याला हातभार ,समविचारींशी संपर्क , व्यावसायिक मान्यता वगैरे कारणे असतातच.
ब्लॉगच्या विषयातही अमाप विविधता आहे. बातम्या , राजकारण , प्रवास , तंत्रज्ञान , करमणुकीची साधने ,सिनेमा , प्रसिध्द व्यक्ती , इत्यादी इत्यादी इत्यादी. ब्लॉगविश्व हा जगाचाच आरसा आहे.