नोकियाच्या टॅबलेटला दोन बॅटरी?

web.jpgसरते वर्ष कोणत्या गोष्टीचे ठरले , तर स्मार्टफोन आणि टॅबलेटचे , असे म्हणायला हरकत नाही. स्मार्टफोनच्या विक्रीने नवे आकडे दाखविले. नोटबुक आणि नेटबुकला असणारा पर्याय असलेला टॅबलेट हा काही वर्षांपूर्वी अॅपल या कंपनीमुळे बाजारात आला. मात्र , या प्रॉडक्टला बाजारपेठेतून प्रतिसाद मिळण्यासाठी २०१२ हे वर्ष पाहावे लागले. 


या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत खऱ्या अर्थाने या प्रॉडक्टला बाजारपेठ मिळाली. याला यातील फीचर किंवा या प्रॉडक्टची यूजेब्लिटी (वापर) नव्हे , तर किंमत महत्त्वाची ठरली. तीस हजार रुपयांच्या पुढे किंमत असलेल्या टॅबलेटला थेट दहा हजार रुपयांपर्यंत आणण्याची स्पर्धा २०१२ मध्ये सुरू झाली आणि पाहता पाहता या प्रॉडक्टला बाजारपेठ मिळू लागली. दुसऱ्या सहामाहीत देशातील अनेक नव्या कंपन्यांना या प्रॉडक्टच्या बाजारपेठेने खुणावले. परिणामी , अनेक कंपन्यांनी अशी प्रॉडक्ट बाजारात आणण्यास सुरुवात केली. दहा हजार रुपयांपर्यंत मर्यादित असणारे टॅबलेट पाच हजार रुपयापर्यंत खाली आहे. अर्थात ,यातील फीचर , टच , इंटरफेस किती चांगला आहे हे महत्त्वाचे नाही. मात्र , या लो कॉस्ट टॅबलेटमुळे तंत्रज्ञानापर्यंत पोचण्याचा मार्ग खुला झाला हे नक्की. 


अॅपल , सॅमसंग या टॅबलेटमधील आघाडीच्या कंपन्यांनंतर ब्लॅकबेरी , एचसीएल यांच्यासह दूरसंचार कंपन्यांनीदेखील टॅबलेट बाजारात लाँच केलेले आहेत. सॅमसंग कंपनीमुळे मोबाइल बाजारपेठेत नोकिया या कंपनीस मोठी स्पर्धा सहन करावी लागत आहे. नोकिया कंपनी टॅबलेटच्या बाजारपेठेत आपले नशीब आजमावण्याच्या विचारात आहे. कंपनीने याबाबत कामही सुरू केले आहे. नव्या वर्षात म्हणजे २०१३ मध्ये या कंपनीचा टॅबलेट बाजारात येणे अपेक्षित आहे. आतापर्यंत बाजारात उपलब्ध असलेल्या टॅबलेटला एकच बॅटरी आहे. मात्र , नोकियाच्या टॅबलेटला दोन बॅटरी असणार आहेत. त्यातील एक बॅटरी ही नेहमीची आणि दुसरी की-बोर्डच्या खाली असणार आहे. आता आणखी एक बॅटरीचा फायदा काय , असा प्रश्न यूजरच्या मनात नक्की येणार आहे. मात्र , टॅबलेटची बॅटरी कमी झाली की , की-बोर्डच्या बॅटरीवर टॅबलेट चालणार आहे. या बॅटरीची क्षमता दहा तासांची असेल , अशी अपेक्षा आहे. या टॅबलेटची एखाद्या पुस्तकाप्रमाणे घडी घालता येणार आहे. या टॅबलेटला एचडीएमआय केबल आणि यूएसबी पोर्ट आणि १०.१ इंचाचा टच स्क्रीन असणार आहे. 


तसेच , या टॅबलेटसाठी एआरएम प्रोसेसर असणार असून , विंडोज आरटी ही ऑपरेटिंग सिस्टीम असणार आहे. या टॅबलेटमुळे कंपनीला नवा सूर गवसण्याची अपेक्षा या निमित्ताने करता येईल. 

Exit mobile version