आयफोनचा व्यावसायिक कॅमेरा कसा तयार करायचा याची रेसिपी

बाहेर मित्र मैत्रिणींसोबत फिरायला जायचं असो वा कामासाठी, पन्नास गोष्टी कुठे वागवत बसणार? तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय मग अनेक गोष्टी सहज शक्य का नाहीत, असा नव्या पिढीचा सवाल असतो. भारतात आयफोनची क्रेझ वाढत असताना त्यामधील वैशिष्ट्यांमुळे त्याचा सर्रास वापर व्यावसायिकांपासून ते पत्रकार- विद्यार्थ्यांपर्यंत होत आहे. म्हणूनच तो अधिक प्रगत बनवण्यासाठी आयफोनचा व्यावसायिक कॅमेरा कसा तयार करायचा याची रेसिपी या लेखात देत आहोत. 

त्यासाठी तुम्हाला लागणार आहे आयफोन, फॉस्टेक्स एआर ४आय ऑडिओ इंटरफेस, ओलोक्लिप कंपनीची आयफोन थ्री इन वन लेन्स, झूमइट एसडी कार्ड रिडर आणि जॉबी गिरोल्लापॉड फ्लेक्झीबल ट्रायपॉड.

ट्रिपल इनपुट एआर ४आय
आयफोन वापरणाऱ्यांना त्यांच्या अक्सेसरीज विकत घ्यायला खूप आवडतात पण त्याचा योग्य उपयोग होत नसेल तर त्यावर कारण नसताना खर्च करण्यात काय उपयोग. याआधी बाजारात अडॅप्टसोबत वाईड अ‍ॅंगल, मॅक्रो, पॅनोरॅमिक आणि मायक्रोस्कोप लेन्स आल्याचे आपण पाहिले आहे. आता फॉस्टेक्स कंपनीने एक पाऊल पुढे टाकत ट्रिपल इनपुट एआर ४आय ऑडिओ इंटरफेस खासकरून आयफोनसाठी बाजारात दाखल केला आहे. ह्या डिवाईसमध्ये दोन स्विवेलींग कार्डीओईड कंडेन्सर माईक आहेत जे ३.५ एमएम स्टिरिओ इनपुटवर माऊंट करता येतात. जर फोन आडवा पकडायचा असेल तर ते इंटरफेसच्या वरच्या बाजूस माऊंट करता येतात. किंवा फोन उभा पकडायचा असेल तर इंटरफेसच्या दोन्ही बाजूला माऊंट करता येतात. मुलाखत घेताना माईक आपल्याला जी व्यक्ती बोलत आहे त्याच्या समोर धरावा लागतो, जेणेकरून फक्त त्या व्यक्तीचा आवाज स्पष्टपणे रेकॉर्ड केला जाईल. 
                   पण या इंटरफेसमुळे मुलाखत घेणे फारच सोप्पे झाले आहे. कारण यातील दोन्ही माईक तुम्हाला हव्या त्या दिशेला तुम्ही फिरवू शकता. त्यामुळे जो मुलाखत घेत आहे आणि ज्याची मुलाखत घ्यायची आहे अशा दोघांचाही आवाज कॅमेरा न हलवता स्पष्टपणे रेकॉर्ड करता येतो.  दोन्ही माईकच्या आवाजाची पातळी काय आहे हे एका सरळ रेषेत असणाऱ्या एलईडी लाईटद्वारे आपल्याला कळते आणि
त्याच्या बाजूलाच असणाऱ्या स्क्रोलिंग बटणाद्वारे ती पातळी कमी जास्त करता येते. एवढंच नव्हे तर यामधील हेडफोन जॅकमुळे तुम्ही आवाजाची गुणवत्तासुध्दा लागलीच पडताळून पाहू शकता.
तुमचा आयफोन तुम्हाला या इंटरफेसमध्ये फक्त स्लाईड करायचा आहे. मग तो आपोआप यामध्ये फिट बसतो. अडॅप्टरच्या बाजूला आणि खालच्या बाजूस असणाऱ्या स्क्रू होल्डमुळे तुम्हाला एआर ४आय ट्रायपॉडवर माऊंट करता येतो किंवा याच्याचबरोबर येणाऱ्या अल्युमिनिअम हॅन्ड ग्रीपवरही माऊंट करता येतो.  माईक आणि हेडफोनच्या सुविधेमुळे हा चालतो कशावर, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण घाबरू नका हा तुमच्या फोनची बॅटरी वापरणार नाही. त्यासाठी यामध्ये दोन एएए बॅटरीसाठी छोटा बंद स्लॉट देण्यात आला आहे, ह्या बॅटरीज् जवळपास सलग दहा तास चालतात. एवढंच नव्हे जर तुम्हाला शक्य असल्यास आणि कॅमेरा एकाच ठिकाणी ठेवून शूटींग करायचं असेल तर तुम्ही यूएसबी कनेक्शनद्वारेसुध्दा इंटरफेसला वीजपुरवठा करू शकता.
                                        हा इंटरफेस बाजारात फक्त साडेसात हजारांना उपलब्ध आहे. ज्यांना आणखी पर्याय हवे असतील ते औल बुबो कंपनीचा इंटरफेसही ट्राय करू शकतात. ज्याची पकड प्लेस्टेशनच्या हॅन्डलसारखी आहे आणि यामध्ये शॉटगन स्टाईल माईक आहे. ओलोक्लिप आयफोन थ्री इन वन लेन्स सिस्टम अडॅप्टर आयफोनचा आठ मेगापिक्सेल कॅमेराही आपल्याला कमीच वाटतो. कारण काही कंपन्यांनी मोबाईलला ४० मेगापिक्सेल कॅमेरे दिले आहेत. मग असा विचार मनात येतो की, एवढा महागातला फोन आणि त्याला आणखी चांगला कॅमेरा का नाही. याच मर्यादा ओळखून ओलोक्लिपने आयफोन थ्री इन वन लेन्स सिस्टम अडॅप्टर तयार केले आहे.
ज्यामध्ये तुम्हाला फिशआय, वाईड अ‍ॅंगल आणि मॅक्रो लेन्स मिळेल जी तुमच्या खिशात, तळहातावर सहज मावू शकेल.  अगदी एका सेकंदात तुम्ही ही लेन्स तुमच्या आयफोनशी कनेक्ट करू शकता. त्यामुळे कॅमेऱ्याच्या टप्प्यात न येणारे चित्र तुमच्या कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त होणार आहे.
मॅक्रो लेन्समुळे तुमचे ऑब्जेक्ट जवळपास १० एक्स पटीने जवळ येते आणि तुम्ही १२ ते १५ एमएम इतक्या कमी परिसरात लक्ष केंद्रित करू शकता. फिश आयही लेन्स १८० अंशाचा परिसर कव्हर करते आणि सर्वोत्कृष्ट परिणाम देते. तर जेव्हा तुम्हाला नेहमीच्या आयफोन कॅमेरापेक्षा जास्तीचा फिल्ड ऑफ व्हयू हवा असतो तेव्हा ते काम वाईड अ‍ॅंगल लेन्स करते. याची किंमत सात ते आठ हजार आहे.
जॉबी गिरोल्लापॉड फ्लेक्झिबल ट्रायपॉड
हा फ्लेक्झिबल ट्रायपॉड विशेषत: डिजिटल कॅमेऱ्यासाठी तयार करण्यात आला असून ३७५ ग्रॅमपर्यंतचे वजन घेऊ शकतो. जो तुमच्या छोट्याशा बॅगेत अथवा जॅकेटच्या खिशातही सहज मावतो. पसरट पृष्ठभाग असो वा एखादा खांब हा कुठेही माऊंट करता येतो. यामुळे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये टाइमर लावून अगदी कुठेही फोटो काढता येतात. हा ट्रायपॉड बाजारात साडेतीन ते चार हजारांमध्ये उपवब्ध आहे. 
 
झूमइट एसडी कार्ड रिडर

हे तुम्हाला तुमच्या कॅमऱ्यामधून हॅन्डसेटमध्ये फोटो घ्यायला मदत करतो. तुम्हाला हे तुमच्या आयफोनच्या डॉक कनेक्टरला जोडायचे आहे, ज्यामुळे तुम्हाल फोटो इम्पोर्ट करता येतील आणि हव्या त्या सोशल नेटवर्कींग साईटवर अपलोड करता येतील अथवा ईमेल करता येईल. यामुळे फोटो आयओएस अ‍ॅपवर आणि अ‍ॅडॉब फोटोशॉपवर घेऊन ताबडतोब एडिट करण्यास मदत
होते. हे कार्ड रीडर वेगवेगळ्या मीडियाला सपोर्ट करते, ज्यामध्ये ऑडिओ, व्हिडीओ, स्टॅन्डर्ड डॉक्युमेंट टाईप्स
(डॉक, एक्सएलएस, पीडीएफ इ.) आणि फोटोंचा समावेश आहे. बाजारात याची किंमत ३००० च्या आसपास आहे.

—- प्रशांत ननावरे

Exit mobile version